चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी या गावात बिबट्याच्या हल्ल्यात नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. स्वराज गुरनुले असे या चिमुकल्याचे नाव आहे. स्वराज घरात झोपलेला असताना बिबट्याने त्याला घरातून पळवून नेऊन ठार मारले.स्वराजच्या घरच्यांनी शोधाशोध केल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. चिमुकल्या स्वराजला घरात घुसून बिबट्याने पळवून नेत ठार केल्याच्या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील संघारामगिरी (रामदेगी) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ध्यानस्थ बसलेल्या एका बौद्ध भिक्खूचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील पोवनपार येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेला होता.